मका खरेदी व्यवहारात ६६ लाखांची फसवणूक

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : कोट्यवधी रुपयांचे धान्य खरेदी करून नंतर पसार व्हायचे, या कार्यपद्धतीचा फटका येथील महिला व्यापाऱ्याला बसला. या व्यवहारात ६५ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी संतोष कुमार रमेश आडला (वय ३४, रा. सरूरनगर, हैदराबाद) याला अटक केली आहे. 

न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्याच्याकडून चारचाकी वाहन जप्त केले आहे. कावेरी कैलास शेळके (वय ४९, रा. वैजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. शेळके यांचा वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह विविध बाजारपेठांमध्ये मका खरेदी - विक्रीचा व्यवसाय आहे. 

या व्यवसायातून त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. त्यातून आरोपींनी जानेवारी आणि फेब्रुवारी या कालावधीत शेळके यांच्या गोदामातून विविध वाहनांद्वारे तब्बल १ कोटी ४९ लाख ५८ हजार रुपयांचा मका खरेदी केला. ठरलेल्या रक्कम आगाऊ स्वरूपात बँक खात्यात व्यवहारानुसार, आरोपींनी ५० टक्के जमा करणे आवश्यक होते.
त्यानुसार आरोपींनी ७३ लाख ५९ हजार ८७९ रुपये अदा केले.

मात्र उर्वरित ६५ लाख ९८ हजार ३६८ रुपयांची रक्कम दिली नाही. शेळके यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी मोबाईल बंद करून संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेळके यांनी पोलिसांत धाव घेतली. 

पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी संतोष कुमार आडला याला हैदराबादच्या सरूरनगर भागातून शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस, अंमलदार गणेश काळे, अमोल कांबळे व शुभम रावते यांनी केली असून, पोलिस या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.